निसर्गरम्य अक्षी आणि प्राचीन शिलालेख
निसर्गरम्य अक्षी आणि प्राचीन शिलालेख

अक्षी. अलिबाग-चौल मार्गावर वसलेले छोटसे गांव. अक्षी गांव ओळखण्याची खुण म्हणजे रस्ता दुभाजकाचे काम करणारा स्तंभ. ह्या स्तंभापासून साधारणपणे १.५ किमी वर आहे अक्षीचा समुद्रकिनारा. समुद्रकिनाऱ्यापर्यंत थेट गाडी जात असली तरी अक्षी गावात पायी फेरी मारण्याची वेगळीच मजा आहे. पर्यटकांसाठी अक्षी मध्ये आहे नारळी-पोफळीच्या बागा, किनाऱ्यावरील पांढरी वाळू व सुरुच्या बागा, सुंदर समुद्र आणि दूरवर दिसणारा कुलाबा किल्ला. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक व संशोधक यांच्यासाठी अक्षी गावात आहे ग्रामदैवत सोमेश्वर महादेव व कालिकादेवी (श्री काळंबा देवी मंदिर / कालकाबोरवा) यांची मंदिरे आणि दोन गध्देगाळ. एका गध्देगाळीवर शिलाहारवंशातील राजाचा, तर दुसरीवर यादववंशातील राजाचा लेख आहे.
मुख्य रस्त्यावरून आक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरसुध्दा कौलारू आहे. मंदिराचा सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकडी खांबांवर बारीक कोरीवकाम केला आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या दोन्ही देवकोष्टकांमध्ये गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर सुंदर दीपमाळ आहे. सोमेश्वर मंदिर बघून झाल्यानंतर आपली नजर वळते ती रस्त्याच्या पलीकडे एका चौथऱ्यावर असलेल्या गध्देगाळीकडे. सर्वसामान्य पर्यटकांसाठी गध्देगाळ म्हणजे नुसता एक दगड. पण इतिहास अभ्यासकांसाठी शिलालेख वाचनीय गध्देगाळ म्हणजे खजिना. कारण अशा अनेक गध्देगाळींमुळे बहुमोल माहिती उजेडात आली आहे.
सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गध्देगाळीविषयी कुलाबा गॅझेटमध्ये “About ten feet to the left of the Someshvar temple is an inscribed stone, 5’5” long by 1’3” broad, Above are the sun and the moon followed by fifteen lines of writing in the Devnagari characher and below the writing is the ass-curse” अशी माहिती दिलेली आहे.
गध्देगाळीवर लिहिलेला लेख ओबडधोबड शिळेवर कोरलेला आहे. माथ्यावर चंद्रसूर्य, नंतर लेख व सर्वात शेवटी गाढव-स्त्री यांचे शिल्प अशी रचना आहे. लेख पंधरा ओळींचा असून शेवटची ओळ अर्धवट आहे. प्रत्येक ओळीत १२ ते १५ अक्षरे आहेत. गध्देगाळ अनेक दशके उघड्यावर पडलेली असल्याने फक्त ८-१० ओळीच अर्धवट वाचता येतात. लेखाचा प्रास्ताविक भाग संस्कृतमध्ये, तर दानविषयक तपशील व शापवचन मराठीत आहे. शके १२१३ (सन १२९१) काळातील लेख असून यादव राजघराण्यातील श्रीरामचंद्रदेव याच्या कारकिर्दीत कोरला आहे.

- स्री सकु १२१३ खर संवछारे चैत्र सुध
- ८ सुक्रे अद्येह स्रीमत्प्रौढिप्रतापचक्र –
- वर्त्ति स्रीरामचंद्रदेव विजयोदयी तत्पा –
- दपद्मोपजीवी स्रीजाइदेव – – तेहाचे स्री – इ
- स्वरदेव क्षत्रिय ————————–
- त्रींबकानी स्री अक्षी का(लि)कादेवी –
- ब्राम्हणासि प्रदेसु ————- पुत्रें दत्त मा –
- गे तेआ ग १ ————————–
- ——————————————
- पुर्वे | पस्मे —————————-
- ——————————————
- ——————————————
- ———————————- हें जो
- लोपी तेहाचीये माएसी गाढौ घोडु झविजे
- ———————————- सुभं भवतु |
श्रीशके १२१३ खर संवत्सर चैत्र शुध्द ८ शुक्रवार या दिवशी श्रीमत्प्रौढप्रतापचक्रवर्ती श्रीरामचंद्रदेव याची राजवट असताना त्याचा पादपद्मोजीवि श्रीजाईदेव याचा (मुलगा?) श्रीईश्वरदेव क्षत्रिय याने अक्षी कालिकादेवी ब्राम्हणास १ ????. याच्या पुढील ओळी वाचता येत नाही आहेत. परंतु पूर्वे व पस्मे या दोन वाचता येणाऱ्या शब्दांवरून त्यात जमीन दान दिल्याचा व त्या जमिनीच्या सीमांचा उल्लेख असावा. हे दान जो कोणी नष्ट करेल त्याच्या आईस गाढव व घोडा लागतील (झवतील). शुभं भवतु.
शके १२१३ मध्ये उत्तर कोकणावर रामचंद्र यादव याची सत्ता होती व या भागावर श्रीजाईदेव या अधिकाऱ्याची नियुक्ती होती हे दिसून येते. हे दानपत्र श्रीजाईदेव याचा मुलगा(?) श्रीईश्वरदेव क्षत्रिय याचे आहे. लेखात अक्षी गावातील कालिकादेवीच्या ब्राह्मणास दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. दानाचा उल्लेख नष्ट झाल्यामुळे १ च्या पुढे काय लिहिले आहे हे कळून येत नाही. अक्षी व कालिकादेवी यांचा हा सर्वात जुना उल्लेख असावा. गावात असलेले सध्याचे कालिकामंदिर जीर्णोद्धार केलेले आहे.
सोमेश्वर मंदिराकडून कालिकामंदिराकडे जाताना डावीकडे अक्षी गावातील दुसरी गध्देगाळ आहे. या गध्देगाळीविषयी कुलाबा गॅझेटमध्ये पुढीलप्रमाणे माहिती आली आहे. Akshi has two temples, one of Kalkaborva Devi and the other of Someshwar Mahadev. About twenty-five paces from the Devi’s Temple, on the road, to the left of the house of one Rama Naik, is an inscribed stone 4’-3” long by 1’ broad. Above are the Sun and the Moon followed by the Ass-curse; then comes a roughly cut writing of nine lines in Devnagari character, and below the writing, a second representation of the Sun and Moon.
गध्देगाळीवर असलेला लेख द्वितीय केशिदेव (शके ११३१) याच्या काळातील आहे. वरती सूर्यचंद्र, त्याखाली गाढव-स्त्री यांचे शिल्प, त्यानंतर लेख व खालती पुन्हा सूर्यचंद्र अशी या गध्देगाळीची रचना आहे. शिलालेखात एकूण नऊ ओळी असून प्रत्येक ओळीत ११ ते १४ अक्षरे आहेत. गध्देगाळ व लेख अंदाजे नऊशे वर्ष जुना असल्यामुळे व अनेक शतके उघड्यावर असल्याने लेख बराच खराब झाला आहे व आता वाचतासुध्दा येत नाही.
- गी सुष संतु | स्वस्ति ओं | पसीमस-
- मुद्रधीपती | श्रीकोंकणाचक्री (क्र)-
- वर्ती | श्रीकेसीदेवर(रा)य | महाप्रधा-
- न भइर्जु सेणुइ तसीमीनी क(का)ले
- प्रव्रतम(मा)ने | सकु संवतु: (११)३१ (व)भ-
- वा संवत्सरे: अ कडी धर्मुका बै-
- लु | भईर्ज्जुव त(था) बोडद्म त(भ)न उ-
- करली अधोर प्रधानु | मह(हा)लषु
- मीची प(डी?) कलुन पोकरली (ज)
स्वस्ति ओम. पश्चिमसमुद्राधिपति, कोंकणचक्रवर्ति श्रीकेशिदेवराय याचा महाप्रधान आणि अधिकारी भइर्जु असताना त्या काळी, शके संवत ११३१, विभव संवत्सर, महालक्ष्मीच्या सन्मानार्थ भइर्जु आणि राजाचा प्रधान अधोर यांनी ……… खोदले. जगात सुख असो. असा या लेखाचा आशय आहे.
लेखात नमूद केल्याप्रमाणे महाप्रधान व प्रधान यांनी महालक्ष्मीसाठी काहीतरी खोदले, परंतु लेख अनेक शतके उघड्यावर राहिल्यामुळे प्रत्यक्ष दानाचा भाग नष्ट झाला आहे.
परंतु, शं. गो. तुळपुळे यांनी प्राचीन मराठी कोरीव लेखया पुस्तकात ह्या लेखाचा अर्थ आणि काळ वेगळाच घेतला आहे. तुळपुळे यांनी ह्या लेखाचा काळ शके ९३४ असा घेतल्यामुळे मराठीतील सगळ्यात जुना कोरीव लेख असे काही जण मानतात. परंतु वि. वा. मिराशी यांनी शं. गो. तुळपुळे यांनी दिलेला शके ९३४ हा काळ कसा चुकीचा आहे हे शिलाहार राजवंशाच्या शिलालेखांवर आधारित पुस्तकात दाखवून दिले आहे.
शं. गो. तुळपुळे यांनी ह्या लेखाचा घेतलेला आशय पुढीलप्रमाणे.
स्वस्ति ओम. पश्चिमसमुद्राधिपति, कोंकणचक्रवर्ति श्रीकेशिदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई (सेनापती) असताना त्या काळी, शके संवत ९३४, परिधावी संवत्सर, अधिक मास, द्वितीय पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जुवाने बोडणासाठी नऊ कवली नेमून नेमून दिले. त्यास (त्या दानास) अर्ध्वयू (अध्यक्ष) प्रधान. महालक्ष्मीची आण. लुनया कचली, म्हणजे हा शिलालेख कोरणारा कोरक्या. जगात सुख असो.
लेखात द्वितीय केसिदेवाच्या नावाच्या आधी पसीमसमुद्रधीपती (पश्चिमसमुद्राधीपती) व कोकणचक्रवर्ती अशा दोन बिरूद्या आहेत. याचाच अर्थ उत्तरकोकणचे शिलाहार राजे नुसतेच मांडलिक राहिलेले नव्हते, तर ते प्रत्यक्ष सत्ताधीश झाले होते.
अक्षी शिलालेखाव्यतिरिक्त मांडवी येथील शके ११२५ व चौधरपाडा येथील शके ११६१ असे अजून दोन शिलालेख शिलाहार राजा द्वितीय केशिदेव याचे उपलब्ध आहेत. द्वितीय केशिदेव याने सन १२००-१२४५ या काळात उत्तर कोकणावर राज्य केले होते.
ह्या गध्देगाळीच्या जवळच आहे कालिकादेवीचे मंदिर (श्री काळंबा देवी मंदिर / कालकाबोरवा). पहिल्या गध्देगाळीत ज्या दानाचा आणि कालिकादेवीचा उल्लेख आलेला आहे, तो ह्याच मंदिराशी निगडीत असावा. मंदिरासमोर आधुनिक पद्धतीच्या दोन दीपमाळा असून गाभाऱ्यात कालिकादेवीच्या दोन मुर्त्या आहेत. ह्या मंदिराशेजारीच असलेल्या छोट्या मंदिरात काही वर्षांपूर्वी गावात खोदकाम करताना सापडलेल्या गजलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
अक्षी येथील समुद्रकिनाऱ्याची मजा घेऊन झाल्यानंतर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास सांगणाऱ्या दोन गध्देगाळी, सोमेश्वर मंदिर व कालीका मंदिर (श्री काळंबा देवी मंदिर / कालकाबोरवा) यांना नक्कीच भेट देता येईल.
संदर्भ
- Gazetteer of the Bombay Presidency, Vol. XI (Kolaba & Janjira), p.253
- raigad.nic.in/pdfdocs/DG/1883/appendix_a.html#1
- शिलालेख क्र. ३५, Corpus Inscriptinum Indicarum Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
- प्राचीन मराठी कोरीव लेख (संपादक: शं. गो. तुळपुळे)



Comments
Post a Comment